Hindusthan Samachar
Banner 2 रविवार, अप्रैल 21, 2019 | समय 10:10 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

रत्नागिरी : मतदानादिवशीच्या प्रचाराच्या जाहिरातींचे प्रमाणीकरण आवश्यक

By HindusthanSamachar | Publish Date: Apr 17 2019 8:20PM
रत्नागिरी  : मतदानादिवशीच्या प्रचाराच्या जाहिरातींचे प्रमाणीकरण आवश्यक
रत्नागिरी, १७ एप्रिल, (हिं.स.) : आगामी लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या दिवशी तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय प्रचाराच्या जाहिराती माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्वप्रमाणित करून घेणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात येत्या २३ एप्रिल रोजी मतदान आहे. त्यादिवशी आणि २२ एप्रिल रोजी बहुसंख्य उमेदवारांकडून आणि राजकीय पक्षांकडून वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात. मात्र त्यामध्ये अफवा पसरवणाऱ्या आणि आक्षेपार्ह स्वरूपाच्या राजकीय जाहिराती प्रसिद्ध झाल्यास पूर्ण निवडणूक प्रक्रियेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. असे प्रकार यापूर्वी झाल्याचे आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. अशा जाहिराती प्रसिद्ध झाल्यास प्रतिपक्षाच्या उमेदवाराला स्पष्टीकरणाची संधीच मिळत नाही. त्यामुळे त्याच्यावर एक प्रकारे अन्याय होऊ शकतो. या बाबींना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने संविधानाच्या कलम ३२४ नुसार प्राप्त झालेले तसेच आयोगाला असलेल्या इतर अधिकारांचा वापर करून काढलेल्या आदेशांनुसार कोणताही राजकीय पक्ष, उमेदवार, संघटना किंवा व्यक्तीला मतदानाच्या तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती नियमानुसार जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीकडून प्रमाणित करून घेतल्याशिवाय प्रसिद्ध करता येणार नाहीत. पूर्व प्रमाणीकरणासाठी रत्नागिरीत माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती कक्ष, जिल्हा माहिती अधिकारी यांचे कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, नवीन प्रशासकीय इमारत, ए विंग, तळमजला, रत्नागिरी येथे संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image