Hindusthan Samachar
Banner 2 सोमवार, अप्रैल 22, 2019 | समय 18:22 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

काँग्रेसच्या जाहिरातीतून अशोक चव्हाण बेपत्ता - माधव भांडारी

By HindusthanSamachar | Publish Date: Apr 17 2019 8:22PM
काँग्रेसच्या जाहिरातीतून अशोक चव्हाण बेपत्ता - माधव भांडारी
मुंबई, १७ एप्रिल, (हिं.स.) : महाआघाडीकडून वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा फोटो वगळण्यात आला असून जर चव्हाण यांचा फोटो छापला तर आपल्याला मते मिळणार नाही असे काँग्रेसला वाटत असावे असा मार्मिक टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी लगावला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील अनेक कुटुंबामध्ये भांडणे लावून राजकीय फोडाफोडीची कामगिरी केली व ज्या पवारांमुळे भूखंडाचा श्रीखंड हा शब्दप्रयोग प्रचलित झाला त्या शरद पवार यांनी चौकीदाराने देश खाल्ला असे विधान करणे म्हणजे राजकीय विनोदच म्हणावा लागेल अशी टिप्पणीही भांडारी यांनी केली. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद आयोजीत केली होती. यावेळी भाजपा माध्यम विभाग प्रमुख व प्रवक्ते केशव उपाध्ये आणि विश्वास पाठक उपस्थित होते. भांडारी म्हणाले की, काँग्रेस कोणत्या मुद्यांवर निवडणूक लढवते माहित नाही. पण प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यामुळे आपल्याला मते मिळणार नाहीत, एवढेच नाही तर मिळणारी मतेही जातील असा विश्वास काँग्रेस आणि महाआघाडीला सुद्धा आहे म्हणून मराठवाड्यामध्ये महाआघाडीकडून बुधवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये महाआघाडीतल्या सगळ्या नेत्यांचे फोटो आहेत, मात्र खुद्द प्रदेशाध्यक्ष आणि मराठवाड्यातील नेते अशोक चव्हाण यांनाच वगळण्यात आले आहे. अशोक चव्हाणांना जाहिरातीत दाखवून जनता मते देणार नाही असे काँग्रेसला का वाटते याचे उत्तर काँग्रेसने द्यावे. शरद पवार यांनी आजपर्यंत महाराष्ट्र राज्यातील अनेक कुटुंबामध्ये राजकीय भांडणे लावून कुटुंब फोडली याची आठवण करून पाहावी. भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पुतण्याला बाहेर काढताना ही असेच वाद निर्माण केले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमच्या कुटुंबात भांडणे लावण्यासाठी आले नाहीत. पवार कुटुंबातील वादांचे उल्लेख वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमांमध्ये आले. त्याचा पंतप्रधान मोदी यांनी फक्त उल्लेख केला आहे. ‘चौकीदारांने देश खाल्ला’ असे शरद पवार म्हणतात. मात्र, महाराष्ट्रातील मराठी माणसाला ‘भुखंडाचा श्रीखंड’ असा शब्दप्रयोग त्यांच्या मुळे मिळाला त्या पवार यांनी असे वक्तव्य करणे हा एक राजकीय विनोदच आहे अशी टिप्पणीही त्यांनी केली. शिवबांचा महाराष्ट्र लुंग्या-सुंग्याना भिक घालणार नाही असे ही शरद पवार म्हणतात. शरद पवार त्यांच्या सत्तेच्या कारकिर्दीत किती वेळा रायगडावर गेले आणि किल्ले संवर्धनासाठी त्यांनी काय केले असा सवाल ही भांडारी यांनी उपस्थित केला. दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे गुरूवारी लातूर दौऱ्यावर आहेत. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पेण, रायगड येथे प्रचारसभा होणार आहे. केंद्रीय मंत्री पीयुष गोयल पुण्यामध्ये प्रचारासाठी असणार आहेत. महसुल मंत्री चंद्रकांत दादा पाटील कोल्हापूरमध्ये सभा घेणार आहेत. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे कणकवली येथे प्रचारसभा घेणार आहेत. तर महिला मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर बारामती आणि पुणे दौऱ्यावर असणार आहेत, व आपण सातारा जिल्ह्यात सभा घेणार आहेत अशी माहिती भांडारी यांनी यावेळी दिली. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image