Hindusthan Samachar
Banner 2 गुरुवार, अप्रैल 25, 2019 | समय 15:38 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

इंद्रधनुष्य महोत्सवात युवकांच्या कलाविष्काराची सप्तरंगी उधळण

By HindusthanSamachar | Publish Date: Dec 8 2018 9:05PM
इंद्रधनुष्य महोत्सवात युवकांच्या कलाविष्काराची सप्तरंगी उधळण
नाशिक, ८ डिसेंबर (हिं.स):- एकीकडे ओघवत्या वक्तृत्वाचा वाद – प्रतिवाद, दुसरीकडे सामान्यज्ञानाची कसोटी, एकीकडे ताल – मृदंग – पखवाजाचा स्वर निनाद तर दुसरीकडे नाट्यआविष्कारात अभिनयाची जुगलबंदी, एकीकडे कोलाजच्या माध्यमातून मनातील कल्पनांना चित्ररूप तर दुसरीकडे कागदावर उमटणारे कुंचल्यांचे फटकारे अशा कलाविष्कारातून येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे आसमंत आज दिवसभर कलात्मक ‘इंद्रधनुष्याच्या’ रंगांनी उजळून निघाले. १६ व्या राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य’ चा दुसरा दिवस सकाळपासून रात्रीपर्यंत विविध स्पर्धांच्या निमित्ताने गजबजून गेला. सकाळी सर्वप्रथम विद्यापीठ प्रांगणातील ‘यशइन‘ सभागृहात वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. ‘समाज माध्यम हे सुसंवादाऐवजी विसंवादास कारणीभूत ठरत आहे का‘ असा या वादविवाद स्पर्धेचा विषय होता. त्यात १९ विद्यापीठातील ३४ स्पर्धकांनी सहभाग घेतला. प्रत्येक स्पर्धकास आपले विचार मांडण्यासाठी प्रत्येकी पाच मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. सहभागी स्पर्धकांनी विषयास अनुसरून मराठी, हिंदी व इंग्रजी विषयातून आपले मत प्रदर्शित केले. विषयाच्या समर्थनार्थ व विरोधात सह्भागी विद्यार्थ्यांनी जोरदार प्रतिवाद केला. त्यानंतर सामान्य ज्ञान परीक्षेची अंतिम फेरी घेण्यात आली. पहिल्या दिवशी १३ विद्यापीठाच्या प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांचा संघ याप्रमाणे १३ संघ व ३९ विद्यार्थी या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सहभागी झाले होते. त्यापैकी अंतिम फेरीसाठी सहा संघ पात्र ठरले. त्यांच्यात मोठी चुरशीची स्पर्धा झाली. विद्यापीठ प्रांगणातील ग्रंथालय व माहितीस्त्रोत केंद्रात ‘कोलाज’ व व्यंगचित्रकला रेखाटन स्पर्धा झाली. कोलाज स्पर्धेत १५ विद्यापीठातील १५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ‘अमूर्तजीवनशैली’ हा या स्पर्धेचा विषय होता. त्यानंतर व्यंगचित्ररेखाटन स्पर्धा घेण्यात आली. सायांकाळी उशिरापर्यंत ही स्पर्धा सुरु होती. विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारात सभागृहात शास्त्री संगीत तालवाद्य स्पर्धा मोठ्या दिमाखात झाली. त्यास रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. तबला – मृदंग – पखवाजच्या जोडीने विविध संगीतवाद्यांच्या सुरावटींची भरलेली मैफल रंगली. त्यात १७ विद्यापीठांच्या १७ विद्यार्थ्यांमध्ये रंगलेल्या जुगलबंदीने मैफलीत बहार आणली. त्यापाठोपाठ विद्यापीठ प्रांगणातील दादासाहेब फाळके सभागृहात दुपारपासून रात्री उशिरापर्यंत ‘एकांकिकांचा नाट्ययज्ञ’ सुरु होता. त्यात विविध विद्यापीठातील संघांनी सामाजिक, देशभक्तीपर, कौटुंबिक विषयांची मांडणी करीत एकांकिका जल्लोषात सादर केली. त्यास रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. दरम्यान आज सकाळी आमदार हेमंत टकले यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठास भेट देवून कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन व कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांच्यासह या युवक महोत्सवाची भेट देवून कौतुक केले. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image