Hindusthan Samachar
Banner 2 गुरुवार, अप्रैल 25, 2019 | समय 03:18 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

शाळांच्या विकासासाठी दापोली पंचायत समितीचे व्हिजन दापोली

By HindusthanSamachar | Publish Date: Sep 16 2018 8:38PM
शाळांच्या विकासासाठी दापोली पंचायत समितीचे व्हिजन दापोली
रत्नागिरी, १६ सप्टेंबर, (हिं. स.) : दापोली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तालुका पंचायत समितीने ‘व्हिजन दापोली’ उपक्रम सुरू केला आहे. जिल्ह्यातील अशा तऱ्हेचा हा पहिलाच उपक्रम आहे. उपक्रमाचे उद्घाटन आमदार संजय कदम यांच्या हस्ते दापोलीत झाले. हा उपक्रम आदर्श ठरेल, असा विश्वास श्री. कदम यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले की, आजवरच्या इतिहासात प्रथमच दापोली पंचायत समितीने एक अनोखा आणि नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. राज्याचा असो वा देशाचा, अभ्यासक्रम एसीमध्ये बसून तयार होतो आणि तो खेड्यातील शाळेत राबवावा लागतो. पण काळाची गरज ओळखून आपले सभापती राजेश गुजर यांच्या संकल्पनेतून, पंचायत समितीने आपल्याच तालुक्यातील १०८ उपक्रमशील शिक्षकांमार्फत तयार केलेला व्हिजन दापोली हा उपक्रम राज्याला आदर्शवत ठरणार आहे. पदाधिकारी, अधिकारी व शिक्षकवृंद यांच्यातील सलोख्याच्या वातावरणामुळे हे शक्य झाले. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी मी सर्वतोपरी सहकार्य करेन. पंचायत समितीचे सभापती राजेश गुजर यांनी सांगितले की, व्हिजन दापोली हा आपला स्वप्नवत उपक्रम असून या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी पंचायत समितीचे सर्व सदस्य, तालुका शिक्षण समन्वय समिती, शिक्षक संघटना, मुख्य समिती, विषय समित्या, १०८ उपक्रमशील शिक्षक आणि तालुक्यातील प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व व्यवस्थापन समितीने सहकार्य करावे. मुलाला पुस्तकी किडा न बनवता आत्मविश्वास निर्माण करून ‘माणूस’ बनवायचे आहे. खाजगी संस्थांपेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळा सक्षम झाल्या पाहिजेत. या शाळेतील मुले विविध स्तरांवर चमकली पाहिजेत. माझ्या तालुक्यातील मराठी शाळेत मुलांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण व्हिजन दापोली उपक्रमातूनच मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उपसभापती दीपक खळे यांनीही मनोगत व्यक्त केले. तालुका शिक्षण समन्वय समितीचे सदस्य मुजीब रुमाणे यांनीही उपक्रमाची संकल्पना मन, मेंदू, मनगट यांच्या सर्वांगीण विकासासाठी कशी सार्थ ठरेल, हे स्पष्ट केले. माजी सभापती चंद्रकांत बैकर यांनी खेड्यातील शाळा वाचल्या पाहिजेत, अशा शाळांचा दर्जा वृद्धिंगत होण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, तसेच किमान अध्ययन क्षमतांचा विकास व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम म्हणजे एक पर्वणीच ठरेल, असे त्यांनी सांगितले. उपक्रमाला भरीव साहाय्य करणार्या दापोलीतील देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image