Hindusthan Samachar
Banner 2 शुक्रवार, मार्च 22, 2019 | समय 04:06 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

पालकमंत्र्यांकडून बीदर-कोल्हापूर एक्सप्रेस रेल्वेचे स्वागत

By HindusthanSamachar | Publish Date: Jun 14 2018 9:45PM
पालकमंत्र्यांकडून बीदर-कोल्हापूर एक्सप्रेस रेल्वेचे स्वागत
मुंबई, लातूर, १४ जून, (हिं.स) रेल्वे विभागाने बीदर-कोल्हापूर एक्सप्रेस ही नवीन प्रवासी रेल्वे गाडी लातूर मार्गे दिनांक 14 जून 2018 पासून सुरु केलेली आहे. ही रेल्वे गाडी आज दुपारी 4.10 वाजता लातूर रेल्वे स्थानकावर आली असता पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्वागत करुन आनंद व्यक्त केला. तसेच निलंगेकर व खासदार सुनील गायकवाड यांनी रेल्वेस हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. पालकमंत्री निलंगेकर म्हणाले की, बीदर-लातूर एक्सप्रेस रेल्वे गाडी लातूर मार्गे सुरु झाल्याने लातूर जिल्ह्यातील नागरिकांना पंढरपूर व कोल्हापूरच्या धार्मिक स्थळांना भेटी देणे सोयीचे झाले असून यामुळे अनेक प्रवाशांची सोय झालेली आहे. ही रेल्वे आठवड्यातून एकदाच (प्रत्येक गुरुवारी) आहे. परंतू पुढील काळात ही रेल्वे नियमित येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या रेल्वेमुळे लातूर दक्षिण भारताशी जोडले जाऊन दोन्ही भागातील लोकांना या रेल्वेचा फायदा होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी बीदर- कोल्हापूर एक्सप्रेस ही 20 बोगीची नवीन रेल्वेगाडी लातूर मार्गे सुरू केल्याने आनंद झाला असून या रेल्वे सेवेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन निलंगेकर यांनी केले. तसेच भविष्यात लातूर रेल्वे स्टेशन डबल ट्रॅकचे करुन येथे मोठे जंक्शन निर्माण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार गायकवाड म्हणाले की, बीदर- कोल्हापूर एक्सप्रेस सुरु झाल्याने लातूर रेल्वे स्थानकातून 20 वी ट्रेन सुरू झाली आहे. यामध्ये 5 माल वाहतूक रेल्वे असून 15 प्रवाशी रेल्वे जातात असे सांगून येथील रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व 2 चे लवकरच विस्तारीकरण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच गायकवाड यांनी रेल्वेने उदगीर ते लातूर असा प्रवासही केला. बीदर- कोल्हापूर एक्सप्रेस ही रेल्वे लातूर मार्गे आज पासून सुरू झाली असून प्रत्येक आठवड्यातील गुरुवारी ही रेल्वे दुपारी 12.30 वाजता बीदर येथून सुटणार आहे.तर दुपारी 2.40 वाजता लातूर रेल्वे स्थानकावर येणार असून कोल्हापूर येथे रात्री 10.30 वाजता पोहोचेल असे स्टेशन प्रबंधक तिवारी यांनी सांगितले. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image